आमच्या मराठी मंडळाची अनौपचारिक स्थापना तशी २०१० सालची. उत्तर गोलार्धातल्या डेन्मार्क या छोट्याशा देशात कडाक्याच्या थंडीशी सामना करता करता आम्ही मराठी जन गणेशोत्सव साजरा करू लागलो. त्याचे श्रेय जाते ते अनिता व किशोर बापट या दाम्पत्याकडे. उत्सवाच्या निमित्ताने कोपनहेगन स्थित मराठी मंडळीना एकत्र येण्याची संधी मिळाली. त्यातूनच पुढे मराठी मंडळाची संकल्पना आकारली.
पुढे २०१२ साली मंडळाची औपचारिक स्थापना झाली. मंडळाच्या घटनेची व उद्देशांची मांडणी त्याच काळात साकारली. "जनांसाठी मराठी" या ब्रीद्वाक्यातच मंडळाचा मूळ उद्देश आहे. सर्वजण, जे मराठी बोलतात व बोलू इच्छितात किंवा ज्यांना मराठी समजते त्या सर्वांसाठी "महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क" चे व्यासपीठ खुले आहे.
मराठी संकृती बहुरंगी असल्याने मंडळाच्या पुढील वाटचालीत सर्वांना सामावून घेणे सहज शक्य आहे. मंडळाच्या वाटचालीवर मराठी कला, संस्कृती जपण्याबरोबरच मराठी वाचनाचा प्रसार करण्याचीपण संकल्पना आहे.महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क आज जरी बाल्यावस्थेत असले तरी येणाऱ्या काळात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतंत्र ठसा उमटवेल यात शंका नाही.