डेन्मार्क ची राजधानी असलेल्या कोपनहेगन मधल्या वास्तव्यात इथलं वेगळेपण टिपलं,ते आपल्या पुण्यातच नव्हे भारतात आलं पाहिजे अशी मनोमन अपेक्षा ठेवून लिहिलं,सगळ्यांना ते खूप भावलं.छोटेखानी डायरी स्वरूपात लिहिताना मलाही खूप मजा आली. रोज एक मेसेज डिलिव्हर झाला पाहिजेच हा अट्टाहास मुळीच ठेवला नाही,खरं मनाला पटलं तेच मनमोकळेपणानं लिहिलं.आजच्या डायरीतुन चक्क डिलीव्हरी बद्दलचं पान डिलिव्हर करतेय.
"सकाळीच सुनेनं काही वेगळं वाटतंय लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ म्हणून जाहीर केलं.इकडे प्रेग्नन्सी रहाणं जसं नैसर्गीक तसं डिलिव्हरी पण नव्याणाव टक्के नैसर्गिकच यावर ठाम विश्वास.नऊ महिन्यात तिची सगळी तपासणी दोन क्वालीफाईड मिडवाईफ करत होत्या.त्या तिला हॉस्पिटलने नेमून दिलेल्या.आपण राहतो त्या परिसरातील हॉस्पिटलमध्ये आपली नोंद,आपण ठरवू ते हॉस्पिटल नाही.गल्लोगल्ली हॉस्पिटल नाहीत ,तपासणी लॅब,सोनोग्राफी xरे सेन्टर नाहीतच.
मिडवाईफना तिने मेसेज केला होता.अद्याप स्पेशल डॉक्टर तिला भेटलेही नव्हते,सगळं त्या मिडवाईफ पहात होत्या,मिटिंग असायची त्यांची,अगदीच गरज असेल तरच स्पेशालिस्ट डॉक्टरची भेट अन्यथा नाही. व्हीदोअर नावाच्या प्रचंड हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहचलो तर प्रसुतीचा भाग वेगळाच,नैसर्गिक प्रसूतीसाठी सुसज्ज खोल्या समोर बाग फुलं दिसणाऱ्या.इतर पेशंट ची जा ये नाही,इकडून तिकडे जाणाऱ्या नर्स नाहीत,सिनेमात दाखवतात तशी अत्यवस्थ रुग्णांची ये जा नाही,ताण घेतलेले डॉक्टर नाहीत मुळात त्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर नाही.इतका विचारकरून हे दालन बांधलेलं.
सुनेची पूर्ण केस हँडल केलेल्या दोन मिडवाईफ तयार ,एकदम तयारीच्या फ्रेश ...कातीया आणि हेला अशी त्यांची नावं. "अमृता,नाऊ वुई आर विथ यु" दोघींनी हात हातात घेऊन दिलेल्या आश्वासक आधारावर पुढची पाच सहा तासांची नवजीवाच्या स्वागताची लढाई सुरू होती.कुठे पॅनिक होणं नाही,की घाबरून टाकणं नाही.मुलगा रुम मध्ये सुनेसोबत होता,मी दारात खर्चीवर.बसलेली.....पण थोडी काळजीत....."त्या दोघीतली एक बाहेर आली की मला खबरबात मिळायची,"डोन्ट वरी,ती म्हणाली तेव्हा मीच म्हंटलं "कॉल डॉक्टर..."नो नो ,इटविल टेक सम time,असं सांगून मलाच ब्लॅक कॉफी आणि टोस्ट ब्रेड दिला.
अतिशय उत्तमप्रकारे सगळं हँडल करत त्या दोघींनी एका छोट्या नाजूक परी ला सुनेच्या छातीशी दिलं,गोड आवाजात रडून तिने मी आलेय अशी हळी दिली. "लिटील प्रिन्सेस फॉर यु"असं म्हणून त्या दोघी पुढल्या कामात गुंग झाल्या.कुठेही ताण,धावपळ,धावाधाव नाही.भुलतज्ञ,बालरोगतज्ज्ञ अवतीभवती नाहीत.गरज असेल तर तीन मजली हॉस्पिटलमध्ये सगळं उपलब्ध पण निसर्गाच्या थक्क व्हायला होणाऱ्या कलाकृतीचा हा जणू स्वागत सोहळा.
दोन तासानी चालत सुनेची रवानगी स्वतंत्र खोलीत आणि छोट्या ट्रॉलीत बाळ ,ती ट्रॉली बापाच्या हातात. रात्रीची सुनेची जेवणाची डिश आली त्यात सगळं सगळं होतं,मऊ भात , मेतकूट सोडून......'।आई वडील झालेल्यांनीच बाळ कसं हँडल करायचं ते ट्रेनिंग दिलेलं.दुसऱ्या दिवशी घरी जायची परवानगी. खरी मजा पुढे मालिशबाई, तेल बाळाची आंघोळ ....बाहेरून कोणी येण्याचा घोळ नाही,सगळं आपले आपण करायचं.
आपण रहातो त्या कम्युनिटी मधील नर्स आपल्याला अलॉट केलेली ती आठ दिवसांनी कॉल करून येणार बाळ,त्याची उंची वजन तब्बेत सगळी नोंद ठेवणार.लेडी डॉक्टर एक महिन्याने सुनेला भेटेल,तिचं नाव फोन आधीच दिलेला. सगळं लिहिताना आपलं जुनेपण आपण का विसरतोय? अनुभवी सुईण म्हणजेच इकडची मिडवाईफ असते हो.आपण फक्त सुसज्ज हॉस्पिटल आणि सिझेरियन सोप्प असं मानायला लागलोय की काय ?असा प्रश्न मनात वारंवार येत राहिला.या प्रश्नावर आता रेंगाळत बसून उपयोग नाही,ती छोटी नाजूक परी घरी आलीय,तिचं नाव पण रजिस्टर झालं "मुक्ता". ती मुक्ता आणि मी नव्या आनंदात बांधून जाणारी "बंधमुक्ता" .
सो सगळ्यांना बाय आणि अशी विचारधारा माझ्या देशात येवो अशी प्रार्थना करत,सखी डेन्मार्क डायरी बंद..... तिला पण बाय..।।।
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)