माणसाला सतत नाविन्यपूर्ण काही हवं असतं.तसं आमचं पण पहिल्यांदा डेन्मार्क ला आलो तेव्हा झालं होतं.नवनवीन गोष्टी ठरवायच्या ..हा पार्क ,ते म्युझियम ,तो किल्ला......अगदी नॉर्वे मग बर्गेन तिथला स्वर्गीय नजारा.जीव हरखून जाणं,बघणं अनुभवलं होतं.
बर्गेनच्या टेकडीवर चक्क एक ट्रिप आलेली,त्यातली एक जण म्हणाली"आय एम टीचर ,धिस इज स्पेशल टूर ,ऑर्गनायझड बाय गव्हर्नमेंट..."मी पण शिक्षिका असल्याचा अभिमान बाळगत इंग्लिश मध्ये सांगितलं"आय एम ऑलसो टीचर..."मग फोटो झाले होते.शिक्षक वर्गासाठी शासन फ्री ट्रिप आयोजित करते.ग्रेट वाटलं.
फोटो वरून आठवलं अगदी मॉर्निग वॉक पासून ते बोट राईड पर्यंत ,बागेत ,झू मध्ये,हॉटेल मध्ये भरपूर फोटो गेल्या दोन ट्रिप ला काढून झालेले.अर्थात भारंभार WhatsApp ला चिटकवले नाहीत .. ..काही आनंद तरी आपल्यापाशीच ठेवावेत ना,वहितल्या मोरपिसासारखे...सगळेच उधळून टाकून नयेत,अर्थात असा माझा विचार आहे.
कोपनहेगन मध्ये बागा आहेत की बागेत कोपनहेगन आहे असा प्रश्न पडावा इतकी हिरवळ,इतक्या तऱ्हेची फुलं,सफरचंदाच्या बागा,पांढऱ्या शुभ्र रंगाचा वापर इथे जास्त करतात.टुमदार दुमजली बंगल्याच्या खिडक्यांना मस्त विणलेले पांढरे पडदे आणि सुंदर फुलांच्या कुंड्या,त्यात व्हॉइलेट आणि पांढरी ऑर्चीड खुलून दिसायची. या वेळी डेन्मार्क डायरीतून लिहावं वाटतंय ते इथल्या सूर्यप्रकाशा बद्दल,दिवस रात्र यांच्या चक्राबद्दल.,मे जून आणि पुढच्या दोन महिन्यातलं हे चक्र.....हे लिहितेय तेव्हा रात्रीचे नऊ वाजलेत....आणि खिडकीतून बाहेर बघतेय तर ऊन...स्वच्छ उजेड.....,आता पडदे त्या मागचे ओढायचे दरवाजे बंद करून "चला दहा वाजून गेले,आता दिवे बंद करा,झोपा.... अशी मनाला आपणच आज्ञा करायची मग झाली प्रसन्न निद्रादेवी तर झोपायचं,थोडी झोप झाल्यावर सवयीने जाग आली तर बाहेर टक्क उजडलेलं......वाजलेत किती पाहावं तर पहाटेचे साडे तीन वाजलेले असतात.
याच्या उलट नोव्हेंबर डिसेंबर मध्ये उजेडाचा मागमूस नाही,सूर्यप्रकाश दूरच..... सूर्यप्रकाश,सूर्य त्याच्या चक्राच्या समतोल आपण भारतीय खूप छान अनुभवतो,लहरी हवामान खूप कमी वेळा आढळतं..........इकडे लोक प्रकाश असेल तेव्हा भराभर कामाला बाहेर पडतात. सहज मिळणारी निसर्गाच्या चक्राची गम्मत आपण खुशाल उपभोगतो,त्या मागचं तत्व लक्षात न घेता,उलट पध्दतीने जगून आपलाच ऱ्हास करून घेतोय.
हे त्याचा अभाव असलेल्या देशात आलेय म्हणून जास्त जाणवतंय. उजेडाची महती अंधारात कळते आणि अंधारामुळे उजेडाची किंमत समजते. लहानपणी आजाणत्या वयात लिहिलेला निबंध आठवतोय,प्रत्यक्षात अनुभुती घेतलीय "सूर्य उगवला नाही तर...."
प्रभातीस सारा आसमंत उजळून टाकणाऱ्या सूर्याला, रात्रीच्या साडेनऊच्या सुमारास सूर्य तसाच लख्ख प्रकाशित होता त्याला नमस्कार करून "आजची डायरी बंद केली अन झोपेची आराधना सुरू केली.
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)