डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगन चं वर्णन करता करता माझी सखी डायरी अनेकांची मैत्रीण झाली,त्यानी आम्ही कोपनहेगन मध्ये असल्याचा फील येतोय असा अभिप्राय पण देऊन टाकला. अनेक सुंदर देशात डेन्मार्क खूप भारी ,श्रीमंत,शांत,लॅविश वाटतो .अगदी अलंकारिक भाषेत नेकलेस चं भारी पेंडंट.
बघा ना,इथून नॉर्वे,जर्मनी,स्विझरलँड,लंडन,
पॅरिस,रोम,इटली,ऑस्ट्रिया .... सगळे देश विमानाने तास दोन तासांच्या अंतरावर आहेत.जणू पेंडन्ट च्या भोवतीचे मोतीच. अर्थात क्रूझने नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लो चा प्रवास या वेळी ठरवला.
या क्रूझ प्रवासात इथे दहा बारा वर्षे स्थिरवलेलं हौशी पाठक कुटुंब आणि त्यांचे राहुरी वरून आलेले ,अस्सल शेतकरी असलेले आई वडील भाऊ सगळे होते.बरोबर दही धपाटे यांची शिदोरी होती.
क्रूझ भली मोठी म्हणजे आकडेवारी मध्ये अकरा मजली,बाराशे पर्यटक आणि चारशे स्टाफ अशा सगळ्यांना पेलणारी होती.चीन आणि जपानचे खूप पर्यटक होते,रात्रभर प्रवास सकाळी सुंदर ओस्लो मध्ये प्रवेश करायचा.क्रूझ मध्ये खोलीत कमी आणि भटकंती भरपूर ,समोर अथांग सागर चहूबाजूंनी.क्रूझवर खान पान, खरेदी करण्यासाठी मोठे ड्युटी फ्री शॉप आणि बरंच काही होतंच,पण मी मात्र त्या अथांग सागराशी गट्टी केलेली. दूरवर स्वीडन आणि डेन्मार्क यांना जोडणारा भव्य टेक्नॉलॉजी वापरून समुद्राच्या खालून जाणारा दोन देश जोडणारा तो पूल ओल्लांडून माल्मो या स्वीडन देशातील गावात जाऊन आले होते.शेजारचे देश इतक्या गुण्यागोविंदाने नांदत असतात,क्रूझ मधून दुसऱ्या टोकाला असलेलं स्वीडन दिसत होतं,इतके शेजारी असलेले देश..मग माझ्या भारताचे शेजारी .........असं का वागतात?पुणेकर असल्याने प्रश्न फार पडतात बुवा....😊
पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे उरलेल्या केवळ तीस टक्क्यांवर आपली सगळी जगाची वसाहत.आपलं अस्तित्व किती क्षुल्लक, नगण्य आहे इतकी भव्यता त्या जलतत्वाची वर तितकंच भव्य आकाशतत्व...,वायूतत्व आहे म्हणून आपण जिवंत.खूप कमी बोलावं आणि अनुभव घ्यावा असा हा क्रूझ प्रवास.
अथांग,अपरंपार याचा अर्थ जाणून घ्यायचा तर हा नजारा पाहायलाच हवा.नजर टाकू तिकडे आकाश पाणी एकत्र क्षितिजावर नजर पोहचताना मनात आलं "या अती खोल बाल्टिक महासागरात चाललेली क्रूझ-- जमीन दिसतही नाही ,पण क्रूझ मात्र आरामात निघालेली,आपली सगळी भिस्त आता या क्षणी फक्त त्या जगनियंत्यावरच,कदाचित त्याचा विशाल तळहात क्रूझखाली असावा. विश्वास , श्रध्दा एकवटली.आणि त्या सोळाशे मधली मी एक बिंदू होऊन गेले. ओस्लो,बर्गेन या शहरा मध्ये प्रवेश म्हणजे दोन बाजूला उंच डोंगरच्या आतील चिंचोळ्या समुद्राच्या प्रवाहातून क्रूझ जाते,आपली हिमालयातली देवभूमी आणि ही इकडे स्वर्गभूमी.....।।।
समुद्र पण या लोकांच्या सारखाच मस्त रुबाबात रोरावणारा ....आपल्या सारख्या उसळत्या फेसाळ लाटा नाहीतच. नॉर्वे चं सौन्दर्य वेगळंच,आणखी दक्षिण ध्रुवाला कवेत घेणारं.ओस्लो ची टुमदार घरं,फ्राम म्युझियम,अचाट साहसी बर्फ खेळाचं मैदान, समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं नोबल पीस सेंटर.....आणि खरेदी बहाद्दर असतील त्यांच्या साठी ब्रँडेड नोरडीयन कपड्यांचे मॉल..."एक स्ट्रोल,स्वेटर मला आवडला " total how many?मी विचारलं त्याने स्ट्रोल सहाशे डिकेके आणि स्वेटर पंचवीसशे dkk ला सांगितला म्हणजे स्ट्रोल फक्त सहा हजारला आणि स्वेटर पंचवीस हजार ला आपल्या रुपयांच्या भाषेत हिशोब केला.अर्थात घेतला नाही."असा सेम मिळतो नाही का आपल्या पुण्यात?" माझी कबुली.
पाऊस,ऊन , भन्नाट वारा सगळं अनुभवायला हवं असेल तर" एक क्रूझ ट्रिप करनीच चाहीए......" त्या विशाल सागराच्या अनुभवातून परत आल्यावर कबुली मनमोकळी दिली मुलाला "थोडे दिवस हे सगळं छान छान वाटतं रे बाबा ,परत आपलं गाव बरं अन आपण बरं.पुण्याच्या घरात मन पोहचलं मंडळी.., सगळं अनुभवत असताना डेन्मार्क पुण्याच्या गानू यांच्याकडच्या चष्म्यातूनच बघतेय .
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)