अस्सल,मूळ कोपनहेगन मधलं सौन्दर्य हे वर्णन करणं केवळ अशक्य.त्या बोट राईड मधली ती जादुई फेरी म्हणजे स्वप्न वाटावं इतका सुंदर नजारा.
भव्य अशी नगररचना,भव्य वास्तू जतन केलेल्या.समुद्रात असलेली लिटील मरमेड.जलपरीची नजाकत अप्रतिमच.
इथे आपल्या भारतात पण आहे असं सगळं,ते बघून घ्या आधी असं कुणाला म्हणावं वाटत असेल पण इथे फ़क्त सगळं जतन करण्याची,प्रत्येक नागरिक आपलं म्हणून सांभाळतो हे सांगण्यासाठी ही लेखणी.नाहीतर कुणाला वाटेल,लेखणी बहाद्दर बघा ......थोडे दिवस परदेशात जातात,लगेच गुणगान गातात....उचलली लेखणी लावली.........
कोपनहेगनचं मूळ कुठं पाहायचं तर ते सेन्ट्रल,टाऊनहॉल,तीवोली गार्डन,तिथे त्या भागात फक्त चालायचं "नो व्हेईकल झोन".
आरामसे पायात बूट घालून प्रत्येक जण यहाके हम है राजकुमार राजकुमारी सारखे अखंड चालत असतात.गार हवा ,सगळे कोट स्वेटर घालून कोल्ड्रिंक्स,केक खातात.एक चहा साधा मला हवा होता तो काही केल्या मिळेना,परत तंगडतोड. आपल्या पुण्याचं अस्सल रूप तुळशीबाग म्हंटलं तर तिथे पण नो व्हेईकल झोन केला तर किती बरं होईल नाही का?असा विचार इथेही मनात येत होताच.
डेन्मार्क म्हटलं की साहित्यप्रेमींना हॅम्लेट ची आठवण होणारच. इथल्या हेलसिंगोर मधील कॉर्नबोर्ग कॅसलं त्याचा उल्लेख विल्यम शेक्सपिअर च्या हॅम्लेट मध्ये आहे,ज्याचा नायक राजा डॅनिश आहे.ह्याच हॅम्लेट ची जराशी ओळख कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी नटसम्राट मधून करून दिली
"to be or not to be आणि that's the question" हाच तो जगप्रसिद्ध प्रश्न.
ही मन कुसुमाग्रज यांच्या ठायी नाशिक मध्ये जाऊन पोहचलं.त्यांचं नटसम्राट आठवलं,डॉ श्रीराम लागुंची भेट आठवली.
" कुणी घर देता का घर..."ची आर्त विनवणी कानात घुमली.
अरे मी तर कॉर्नबोर्ग कॅसल मध्ये आहे,क्षणभर विसरले होते.देशभरचे पर्यटक होते,आस्वाद घेत कुतूहलाने बघत होते.....नो खाऊ, नो खाऊगाडी,नो कागद,नो प्लास्टिक ......।
निळाशार समुद्राच्या वेढ्यात असलेला तो भव्य किल्ला,त्या भोवती बीच त्याला लागून एक मोठं हॉटेल,सगळी खानपान व्यवस्था इथेच,बाकी कुठेही नाही. भरपूर झाडपाला घातलेलं एक व्हेज बर्गर मिळालं. ( मुळात व्हेज काही नाहीच मिळत)
त्याचा आस्वाद घेताना मुलगा विचारतो "काही आणलं आहेस का घरून? लाह्या चुरमुर्याचा चिवडा वगैरे,लाईट ....हवंय काहीतरी. निघताना तोच बोलला होता" आई उगाच खायचं काही घेऊ नकोस,मिळेल तिथे काही..
आता परत भारतात गेलो की सुमित राघवन ची भूमिका असलेलं हॅम्लेट पाहीनच"याची नोंद करून डायरी बंद.
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)