कोपनहेगन या डेन्मार्क च्या राजधानीचा नगररचनाकार कोण असेल त्याला मानलंच पाहिजे. छोटी छान टुमदार उपनगरं,बहुतेक कौलारू उतरत्या छप्पराचे बंगले,दुमजली घरं ,अंगणात बागबगीचा,फुलांच्या बरोबर अगदी सफरचंद ,चेरीची झाडे, कॉफी टेबल,झाडांचंच कंपाउंड....
आम्ही रहात आहोत तो भाग म्हणजे अपार्टमेंट चा,चार मजली इमारती,प्रत्येक इमारतीच्या मागे पार्किंग,चकचकीत गाड्यांची दिवसभर ये जा सुरू,पण कुठेही गडबड नाही गोंधळ नाही.....मुळात कुठेही ट्रॅफिक पोलीस नाहीच.
प्रत्येक इमारतीला भोवती बाग,हिरव्यागार लॉन चं आच्छादन,मुलांना खेळण्यासाठी खेळणी,मोठे सार्वजनिक जेवणाचं ,कॉफीच टेबल....सूर्य प्रसन्न असेल तर कोणीही यावं मस्त बसावं...आनंद घ्यावा.
सकाळी फिरताना सगळं साठवण करून ठेवते.लागून असलेल्या इशोय च्या कॉलनी जवळ बसस्टॉप वर मुलं मुली शाळेत निघालेल्या वय वर्ष सात आठ असेल त्यांचं,पण सोडायला ,टाटा करायला सूचना द्यायला आईवडील कोणाचेच नाहीत ,हे पण रोजच चित्र.न राहवून मीच त्याना टाटा करायची.
प्रत्येक कॉलोनीत दोन तीन मॉल , खचाखच सामान भरलेले , ब्रेड भाजी दूध फळं ते कपडे सगळं मिळतं ,एखादा अंकल आपली सोय पाहणारा अगदी जिरे मोहरी पापड पासून रवा पोहे ते हिंग डबी पर्यंत सगळं तिथे मिळत.
सायकल स्टँड प्रत्येक इमारतीच्या खाली,इतकंच नव्हे तर कपडे वाळत घालायचा गेट असलेला एरिया प्रत्येक इमारतीच्या मागे.
परत स्टेशन च्या बाहेर लिडल,नीटो,रेमा,सेवन ऐलेवन सारखे मॉल आहेतच.मला प्रश्न अजूनही पडतो "सगळे मॉल चालतात का नाही नीट?"दुकान चालतं की नाही म्हणतो तसं.. पण प्रत्येक ठिकाणी भरपूर गर्दी. तशीच लगबग.सगळीकडे भरपूर खरेदी करणारे पाहून बरं वाटायचं.चाललेत मॉल....खूप सुरक्षित पण सिक्युरिटी नाहीच इमारतीना ,खालच्या मजबूत दाराची किल्ली प्रत्येकाला दिलेली.सगळी शिस्त घरापासून ते सार्वजनिक रस्ते,पूल सगळी आखीवरेखीव बांधणी.
सगळंच इथे सुबक सुंदर का असेल तर .........लोकसंख्या कमी हे एकच कारण असावं... ।मला वाटत आपली लोकसंख्या😢...
हा मुद्दा आजची डायरी थांबवायला योग्य आहे.
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)