कोपनहेगन ची रात्र लख्ख उजेडात सुरू होते आणि साधारण दोन चार तास थोडा फिकट अंधार की साडे तीन च्या आसपास परत उजडलेलंच.कामाच्या लोकांचा दिवस सहा ला सुरू जिम ते ऑफिस,शाळा सगळे सहा ते सात च्या दरम्यान रेडी,लगबगीनं निघालेले.
रस्त्याचं काम सुरू होतं ते करायला दोन माणसं रोज वेळेत हजर,भल्यामोठया मशीनवर काम सुरू.....,अगदी लॉन कापणारा,सफाई कामगार सुध्दा वेळेत...कोणी लक्ष ठेवणारा नाही म्हणजे नो मुकादम...(डहाणूकरला रस्ता झाडणाऱ्या त्याच्या पेक्षा वयस्क सफाई स्त्री कामगारांची हजेरी घ्यायला एक दोन मुकादम येतात मोटारसायकल घेऊन गळ्यात चेन आणि तोंडात तोबरा भरून)पण काम एक नंबर,अचूक, एकदम तल्लीन होऊन केलं जातं.एक दोन सिगारेट ओढण्यात वेळ जात असेल तेव्हढाच.
श्रमप्रतिष्ठा महत्वाची,काम कोणतं आहे,मी हे काम का करायचं ,हलकं आहे की भारी या कडे कोणाचं लक्ष नाही. जसा एखादा करखानदार गाडीतून ऐटीत जाईल तसा शेतकरी,सफाई कामगार पण त्याच ऐटीत येणार. कामवाली ....आपल्याकडे तिच्या वेळा सांभाळून सगळं घर आपले प्रोग्रॅम आखत असतं."जर कामवाली आली नाही तर....हा आता निबंधाचा विषय होऊ शकेल.किती दमवणूक होते आमची काम करून घेताना.
मित्र मैत्रिणींनो इकडे रोजची कामवाली ही भानगडच नाही.आपलं घर आपली स्वच्छता.डिश वॉशर असतो,भांडी पटकन साफ करायला बेसिन ला गरम पाणी पण हजर असतं.स्वतःच काम स्वतः करायची सवय लागतेच. इथे आमच्याकडे आठ दिवसानी एकदा एक मुलगी घर सफाईला येते ती पण टकटक,लिपस्टिक लावून, फ्रेश,हाय हॉलो करत एका तासात सगळं अगदी काचा पुसून शंभर क्रोना म्हणजे हजार रुपये घेऊन सायकलवर टांग मारून निघायची भुर्रकन,आपल्याच आनंदात ...कोणतीच काम कमी हलक्या दर्जाचं इथे मानत नाहीत,हा फार महत्वाचा मुद्दा वाटतो.आपल्याकडे असली काम आपण नाय करत अस सरळ सांगतात आणि त्यातच भूषण. आपलं काम आवडून करणं हे इथं दिसतं,लादलेला भाग नाही. पॅशन महत्वची.काम आवडलं तर आवडीनं केलं जाईल.
अगर ऐसा हमारे यहां होता
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)