प्रवासाचा शीण वगैरे काही आला नव्हता,पण कुणी विचारलं ना "दगदग झाली असेल प्रवासाची" की लगेच ती नसली झाली तरी झाल्यासारखं दाखवून "हो ना" असं म्हणावं लागत बहुतेक.एकतर वेळ घालवायला विमानात समोर मस्त टी व्ही असतोच,उगाच आपण काहीबाही बघत राहतोच,आणि तोंड सुरू राहायला सतत खायला देऊन परत नाजूक आवाजात कुणी उसन्या प्रेमानं विचारत
"यु वॉन्ट एनी मोअर?
झालं .....बरेच जण नको असलं तरी घेत असावेत ,खाणं आणि नेत्रसुख..... ?😊
कोपनहेगन मधील उपनगर "इशोय" (आपल्या पिंपरीचिंचवड सारख) च्या घरात आल्यावर अद्रक डालके एक चहा झालाच.दगदग झाली होती ना?म्हणून.
थोडया गप्पा झाल्यावर जेवण,चक्क खिचडी कढी पापड,इंटरनॅशनल मेनू. खरंच वाटेना पुण्यात डहाणूकरला आहोत की कोपनहेगन मध्ये. परदेशात मुलं आहेत म्हणून किती मस्त, ग्रेट,भारी वाटणं याच्या पलीकडे जाऊन आता वाटतं साता समुद्राच्या पलीकडे काही वेगळं नसतं(जयसिंगपुरची मैत्रीण,स्विट्झर्लंड ला राहून आलेली ती सांगायची ते मनोमन पटलं) बस थोडी माणसं उंच धिप्पाड, त्याचं रंग रूप ,वागणं ,जगणं बस इतकाच काय तो फरक..........
"बाकी कुछ भी अलग नही होता"
आपल्या जगण्याचे विचार ,आचार,पध्दत घेऊनच इथेही वागायचं आणि जगायचं हे एकदा पक्कं ठरवलं की मग कुठेही जगाच्या पाठीवर जड वाटत नाही उलट अधिक सोप्प वाटायला लागतं सगळं.
केस कापून घेऊन,पॅन्ट टीशर्ट मध्ये चार दिवस मिरवत राहिलं तरी माझं मूळ मी नाही विसरू शकत.दुनिया गोल है,छोटी भी है,पुन्हा तेच पुणे...तीच डहाणूकरची गल्ली...आणि तुम्ही सारे ...वाट बघत असणार याची खात्री आहे.भरून आलंय मला आणि पेनाला पण.
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)