एकदा का परदेशात निघायची तारीख पक्की झाली,तिकडून तिकीट काढून पाठवलं गेलं की आम्ही सज्ज व्हायला लागतो. बूट,चपला पासून ड्रेस वगैरे सगळ्या तयारीत दिवस भुरभुरावे तसे पळत राहतात. खरी गंमत कुठे सुरू होते,"किती किलो समान अलाऊड आहे,विमानात केबिनमध्ये किती ठेवता येईल ?असे प्रश्न खोदून विचारून घेऊन खात्री झाली की मग आमचा उत्स्फूर्तपणे वाढणारा उत्साह गप्प बसू देत नाही.
तेवीस किलोच्या दोन बॅग नेता येतात कळलं की मग प्रत्येक बॅग साडे बावीसकिलोची आपण करू शकतो यावर आपण ठाम होतो. मग त्या बॅगेत" ठेवता ठेवता सामान.....किलोच भान सुटतं. म्हणजे हवेच म्हणून चितळे,जोशी,कांताबेन बॅगेत जागा पक्की करून बसलेले असतात.मग उमाळा येतो"घरचं काहीतरी पाहिजेच ,चटण्या मेतकूट चिवडा खास बेसन लाडू....एक दिवस किती किलो झाले ते चेक करावं तर बॅगेनी चक्क तीस किलो धारण केलेले असतात.मग थोडी चिडचिड,उगाच अट्टाहास ,तुझं अतीच असतं अशी मुक्ताफळं ऐकायची.तुमच्या बहिणीच, माझ्या बहीण वहिनी ,विहिणबाई यांचं सामान कसं काढू?माझा प्रश्न.मग इकडच्या बॅगेतलं तिकडे करता करता एक बॅग वाढतेच.
इतक्यात कोणी मैत्रीण फोनवर विचारते "कोपनहेगनला निघालीस ना,एक छोटा पॅक आहे,मुलगी तिकडे आहे तिला द्यायचाय?
ह्यांच्या खाणाखुणा सुरू,त्याकडे दुर्लक्ष करत मी तिला सांगते हो दे ग,नेईन की त्यात काय? अहो,आपण गेल्यावेळी तिच्यावर छोटा पॅक म्हणत चांगलं चार किलो चं ओझं दिलं होतं. सगळं कसबस करत साडे बावीसच्या ४ भल्या मोठया बॅगा तयार. विमानतळ गाठून सोपस्कार झाले लगेज मोजणी करून आता विमानात गेलं की सुटलो,"लगेज ठेवणारा उचुलून बॅग वर ठेवत होता,तसा बारीकच होता तो, उगाचच मला वाटलं,बिचारा माझ्या प्रेमापोटी,हव्यासापोटी बांधलेलं ओझं तो उचलतोय. विविध प्रकारची पिठं,चिवडा लाडू,कुरड्या पासून ते बडीशेप ओव्या पर्यंत खच्चून भरलेल्या बॅगा.तिसऱ्या बॅगेच्या वेळी मी त्याच्याकडे बघणं टाळलं,तरी आपल्या प्रेमाचं कुणा दुसऱ्याला ओझं होईल इतकं,का न्यावं द्यावं?हा प्रश्न मीच स्वतःला विचारत राहिले.
वऱ्हाड निघालं नव्हतं पण सामानचं वऱ्हाड घेऊन ,कोपनहेगन ला उतरलो. मुलाने आणि मुलाच्या मित्राने सामान गाडीत ठेवलं,पुन्हा साडे तेवीस मला आठवले. गाडी सुरू करत मुलगा म्हणतो"आई समान इतकं आणण महत्वाच नव्हतं,तुमचं येणं महत्वाचं.सगळं सगळं आता सगळीकडे मिळतं.
आता ह्यांच्याकडे बघण्याचं टाळून मी गाडीतून बाहेर बघत राहिले,हिरवागार कोपनहेगन,सुटसुटीत शरीरयष्टीचे डॅनिश,कमी सामानासह चटपटीतपणे चालत होते,पुन्हा माझ्या नजरेसमोर टम्म फुगलेल्या माझ्या बॅगा....
।।इतिश्री अतिहौस पुराणे
साडे तेवीस किलो सामान
अध्याय समाप्त।।।
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)