आज थोडं इथल्या डेन्मार्क मराठी मंडळाबद्दल.
आपल्याला जे मनापासून आवडतं ना त्याची किंमत कधी कळते तर त्या गोष्टी पासून लांब राहीलं तर.प्रेमाच्या भाषेत त्याला विरह वगैरे म्हणतात तेच ते. इथली मराठी मंडळी आपल्या देशाची सगळी संस्कृती जपतात,गणपती , ढोल ,ताशा, लेझीम च्या गजरात आणतात, दिवाळी साजरी करतात ,मराठी माणसांना बोलावतात,छान कार्यक्रम करतात हे आता सगळं सगळ्यांना माहिती आहेच.
इथल्या मराठी मंडळाची एक भावलेली गोष्ट म्हणजे जे इथे पंधरा वीस वर्षे राहतात, इथे रुळले आहेत,सरावले आहेत, ते सगळे नव्या येणाऱ्यांना आपलंसं करतात,अगदी प्रेमानं ये जा सुरू असते त्यांची एकमेकांकडे. कोणाची आई येणार,कोणाकडे आई वडील दोघे येणार ,मित्रमंडळी येणार याची खबरबात एकमेकांना असते.आई आली की बेसनलाडू मिळणार याची त्याना खात्री असते.मग निरोप निरोपी करून भेटायला येणारच.
कोपनहेगन मधली एखादी जवळची मस्त ट्रिप ठरवतील ,मग पाहुणे पण खास आपलेपणाने आमंत्रित करतील,एकत्र दिवसभर गप्पा गेम खेळ आणि नवीन जागा बघणं ,ओळखी सगळे हेतू साध्य करतात.
आम्ही पण मोन्सक्लिंट ची म्हणजे समुद्रा काठी मोठे चुनखडकाचे उंच डोंगर असलेली सुंदर जागा पाहून आलो.
इथल्या डेन्मार्क मराठी मंडळात तुझा ,निवेदनातले किस्से कविता गप्पा यांचा एकपात्री कार्यक्रम,ज्याचं नाव आनंदयात्री आहे ,तो करशील का ?म्हणून विचारणा झाली तेव्हा एकदम मस्त वाटलं.गेल्या तीस वर्षाची आनंदाची फुलबाग या निमित्ताने इथे फुलवायला मिळणार.मी खुश झाले.इतक्या वर्षात आठशे पेक्षा अधिक वेळा माझ्या या एकपात्री ने अशी आनंदाची फुलबाग फुलवली,आता ती म म डे मध्ये म्हणजे मराठी मंडळ डेन्मार्क मध्ये सादर झाली.
मंगेशकर रजनी ते लिटील चँम्पस ची मजा,निरुपण करताना अभ्यासाचे महत्व,शांताबाई, बाबूजी ,पाडगावकर ,ग दि मा,ह्या आपली दैवतांच्या आठवणी,एका बालगीतात सगळ्यांना खुर्चीतून उठवून मस्त नाच करायला लावला, ध ध धमाल करून घेतली ,आनंदयात्री रंगला सगळे दंग झाले.एक मस्त अनुभव मित्र मैत्रिणीना सांगावा वाटला.
अर्थात भारतात परत आल्यावर मी लगेच देशविदेशात गाजलेला आनंदयात्री अशी जाहिरात मुळीच करणार नाही.कारण साडे आठशे प्रयोगांचा अनुभव केवळ पहिल्या वाहिल्या वर्षात दहा वेळा जाहिरात केली असेल हौस म्हणून पण नंतर एकातून दुसरा अशी कासवाच्या गतीची ही माझी वाटचाल ...आज खरी साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहचली हे सत्य आणि इतकंच नव्हे तर आषाढी एकादशीला संतवाणी च निरूपण पण करणार आहे.ठरला सुध्दा लगेच प्रयोग.
मला सांगा "आनंदाचे डोही आनंद तरंग " म्हणजे आणखी वेगळं काय हो असतं?
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)