दरवर्षी जून महिन्यात पहिलया शनिवारी ग्लॅडसक्से कल्चरल दिवस कम्युन तर्फे साजरा करण्यात येतो. हा एक विविधरंगी कार्य्रक्रम असतो ज्यात वेगवेगळ्या देशांची सांस्कृतिक मंडळं सहभागी होऊन आपापली कला सादर तर करतातच पण त्याचबरोबर विविध व्यंजनं आणि हस्तकलांचे स्टॉल्स पण असतात. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी विनामूल्य असतो. थोडक्यात सांगायचं तर हा विविध देशांमधील सांस्कृतिक तसेच बौद्धिक देवाणघेवाणीचा मेळाच असतो. फार मोठया हिरीरीने सगळेजण यात सामील होत असतात आणि दरवर्षी याची वाट पहात असतात.

सन २०१४ मध्ये प्रथम हा उपक्रम राबवण्यात आला. यापूर्वी पालिकेतर्फे एक आणि टेलिफोन फॅब्रिक (ज्यांच्या इमारतीत हा कार्यक्रम प्रत्यक्ष आयोजिला जातो ती संस्था ) तर्फे एक, असे वेगवेगळे पण साधारण याच धरतीचे कार्यक्रम होत असत. पण दोन्ही कार्यक्रमांचा समान उद्देश आणि लागणारं मनुष्यबळ, वेळ हे लक्षात घेऊन दोन्ही संस्थांनी मिळून एकत्र कार्यक्रम करायचे ठरवले. आणि तेव्हापासून हा कार्यक्रम सुरु झालेला आहे.

अर्थात एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे त्यासाठी नियोजन आणि मनुष्यबळ पाहिजेच. आणि डेन्मार्कमध्ये तर कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर नियोजन खूप आधीपासूनच सुरु होतं. बरेचशे प्रायोजक, सगळी सांस्कृतिक मंडळं , स्वयंसेवक , संबधीत अधिकारी, कर्मचारी ह्यांच्या बरोबर ४-५ महिने आधीपासूनच बोलणी सुरु होतात. संबंधित लोकांच्या, वेगवेगळ्या टप्प्यावर बैठका घेतल्या जातात. ह्याद्वारे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून वेळापत्रकाप्रमाणे तो कसा सादर होईल याचं सादरीकरण सगळ्या मंडळांच्या प्रतिनिधींना बोलावून केलं जातं. विविध मंडळांमधून सहभागी होणारे कलाकार, त्यांना कला सादरीकरणासाठी लागणार वेळ तसेच देशोदेशींच्या पदार्थांचे स्टॉल्स व ते विक्रीची प्रक्रिया , पदार्थांची यादी इ.इ. या सगळ्याची माहिती गोळा केली जाते. त्यानुसार इमारतींमधल्या कुठल्या भागात कुठला कार्यक्रम होईल याचे नियोजन आणि आखणी केली जाते. ही माहिती व सूचना संबंधीत मंडळांना पाठवल्या जातात , जेणे करून प्रत्येकाला आपल्या कलाकाराचा कार्यक्रम किती वाजता व कुठे होईल हे कळावे आणि त्याप्राणेच ते व्हावे.

प्रत्यक्ष कार्यक्रमाची सुरुवात एका मिरवणुकीपासून होते. त्यादिवशी सगळेजण शक्यतो आपापल्या देशाच्या पारंपरिक वेशात आणि काही पारंपरिक वाद्य घेऊन सोबोर्गच्या मुख्य चौकात जमा होतात. तेथे प्रत्येक मंडळाला थांबण्यासाठी आपली जागा ठरवून दिलेली असते, त्या क्रमाने सगळे रांगेत उभे असतात. साधारण १०:१५ ला मिरवणुकीला सुरुवात होते. सर्वात पुढे ग्लाडसकसेचे बँड पथक असते. त्यांच्या श्रवणीय नादात सगळे जण हळूहळू आपापली वाद्ये वाजवत किंवा जोरात आपल्या भाषेतील गाणी स्पीकरवर लावून पाठोपाठ चालू लागतात. ही संधी या एकाच दिवशी मिळत असल्यामुळे सगळे जण याचा फायदा घेतात . एरवी गाडीचा हॉर्न वाजवायला पण बंदी असते ना म्हणून.. साधारण एक -दीड किलोमीटरचे अंतर चालून सगळेजण टेलिफोन फॅब्रिक च्या इमारतीजवळ आल्यावर मिरवणुकीची सांगता होते. साधारण ११ वाजता नगरपालिकेच्या महापौरांचे छोटेखानी भाषण होते व कार्य्रक्रमाच्या उदघाटनाची ते घोषणा करतात. इथूनपुढे सगळेजण आपल्या आवडीचे कार्यक्रम बघायला अथवा विविध देशांच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला त्या त्या दिशेने निघून जातात. साधारण ४ वाजेपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल असते. खाद्यपदार्थ तर सहसा या आधीच संपून गेलेले असतात. अगदी एखाद्या लग्नघरात लगबग असावी असंच वातावरण दिवसभर इथे असतं . कुणीतरी कुणाला शोधात असतो, कुणीतरी एका जागी बसून कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतो, कुणी हस्तकलेच्या वस्तू खरेदीसाठी रांगेत उभा असतो तर कुणी मस्तपैकी खाद्य पदार्थांवर ताव मारण्यात गुंग झालेला असतो. लहान मुलांसाठी पण बरेच खेळ आणि कलाप्रकार असतात. त्यामुळे ते ही रमतात.

अशा या रंगारंगी कार्यक्रमात आपलं महाराष्ट्र मंडळ नेहेमीच उत्साहाने सहभागी होत असत. नृत्य, गायन, हस्तकला, फूड स्टॉल तसेच मिरवणुक यामध्ये मंडळातील बरेच जण भाग घेतात.

विविध कलाप्रकार तसेच अस्सल मराठी खाद्यपदार्थांची ओळख इतर देशांतील लोकांना व्हावी, आपलीही येथे दखल घेतली जावी हीच सगळ्यांची मनोमन ईछा असते. भारतातील इतर राज्यांची मंडळेही अशाच उत्साहाने सहभागी होतात. त्या निमित्ताने मराठी माणसाला आपल्या देशाची पुन्हा एकदा नव्याने ओळख तर होतेच शिवाय इतर देशांना भारत हा किती विविधतेनी नटलेला देश आहे याची झलक बघायला मिळते. एका भारतीयाची बोलीभाषा दुसरा भारतीय समजू शकत नसला तरी संस्कृती सारखी कशी, हे कुतूहल त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत असते. त्या कुतूहलापोटीच प्रत्येकजण पुन्हा पुढच्या वर्षीच्या उत्सवाची वाट पाहायला लागतो.